मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी शासकीय कार्यालये बंद ठेवली आहेत. हा निर्णय जरी योग्य असला, तरी पूर्ण लॉकडाऊन लावू नये, या सर्वसामान्य जनतेच्या मताशी आम्ही सहमत आहोत, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने घेतली आहे. लॉकडाऊन लागल्यास व्यवहार, उद्योग बंद होतील. ही परिस्थिती उद्धभवू नये, यासाठी शासन नियमांचे शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.
'उद्योग व्यापार बंद पडतील'
मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या राज्य सरकारची डोकेदुखी ठरत आहे. ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, तेथे रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. काही ठिकाणी मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, पूर्णतः लॉकडाऊन केल्यास व्यापार, उद्योग बंद होतील.मजुरी करणाऱ्यांचे रोजगार जाऊन उपासमारीची वेळ येईल. शिवाय, कोरोनामुळे वर्षभरानंतर बसत असलेली आर्थिक घडीही विसकटेल. या भितीने सर्वच स्तरातून लॉकडाऊनला विरोध होत आहे.
'शासन निर्णय, शिस्तीचे पालन करा'
कोरोना संक्रमणाचे प्रमाण ज्या भागात अधिक असेल, तर कार्यालये बंद करण्याचे निर्णय योग्य राहील. लवकरच कोरोना संसर्ग कमी व्हावा आणि किमान ५० टक्क्यांची उपस्थिती जनतेच्या हितासाठी, कामांसाठी केली जावी, अशी महासंघाची अपेक्षा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे जनतेने पालन करावे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर जास्तीत जास्त शिस्त पाळावी, असे आवाहन महासंघाच्यावतीने राज्यातील जनतेला करण्यात आले आहे. तसेच मंत्रालयात गर्दी वाढत असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, हे निदर्शनास आले आहे. रुग्ण वाढत असले तरी सरसकट बंदी न घालता, सरकारने व्यवहारी निर्णय घेऊन दिलासा दिला आहे, असेही महासंघाने म्हटले आहे.
'पूर्ण लॉकडाऊन नकोच'
राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावू नये, असे जनतेतून सूर उमटत आहेत. महासंघ या मताशी सहमत आहे. पूर्ण लॉकडाऊन लावल्यास व्यापार, उद्योग बंद होतील. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन लावू नये, या जनतेच्या मताचे आम्ही समर्थन करतो, असेही महासंघाने म्हटले आहे.
हेही वाचा -राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने राज्याला फटका -डॉ. संजय ओक
हेही वाचा - सामान्यांचा लोकलप्रवास बंद होण्यासह मुंबईत कडक निर्बंधांचे महापौरांचे संकेत