मुंबई FDA Action in Thane : राजस्थान आणि गुजरात या भागातून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ राज्यात येतात. याबाबत माहिती मिळताच शुक्रवारी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचेरी तपासणी नाक्यावर खवा वाहतूक करणारी एका खासगी ट्रॅव्हल बसवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईत जवळपास बारा ते पंधरा टन भेसळयुक्त मावा अन् दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय.
मोठ्या नफ्यासाठी दुकानदार करतात भेसळयुक्त माव्याचा वापर : सणासुदीच्या काळात बनणाऱ्या मिठाईचा अविभाज्य घटक असलेला मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा हे पदार्थ राजस्थान गुजरात अशा परराज्यातूनदेखील मागवले जातात. सणासुदीच्या काळात वापरण्यात येणाऱ्या या दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये भेसळदेखील करण्यात येते. मोठ्या नफ्यासाठी दुकानदार हा भेसळयुक्त मावा आपल्या मिठायांमध्ये वापरून नागरिकांचा जीव धोक्यात घालतात. राजस्थान, गुजरात राज्यांमधून मोठ्या प्रमाणात असा भेसळयुक्त मावा खवा, स्वीट मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा शुक्रवारी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पर्दाफाश करण्यात आला.
अशी करण्यात आली कारवाई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी असा बनावट दुग्धजन्य पदार्थांचा साठा ट्रॅव्हल बस आणि टेम्पो मधून आणण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली होती. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे कोकण डिव्हिजनचे सह आयुक्त एस एस देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लेबल नसलेला 1395 किलो आणि रु 2,66,880 किमतीचा साठा नष्ट करण्यात आला. तर यासोबतच अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत साठवलेला तब्बल 45,17,798 रु किंमतीचा एकूण 22879 किलो माल जप्त करण्यात आला असून, त्याचे 42 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. असा भेसळयुक्त मावा आपल्या मिठाईंमध्ये वापरल्यामुळं नागरिकांच्या स्वास्थ्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं संबंधित कायद्यांतर्गत सर्व दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली.
हेही वाचा -