मुंबई - देशात कोरोनाचा धोका वाढत असताना त्यावरील 'फेविपिरावीर' औषध सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असल्याने मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र, या औषधाचा वापर केवळ सौम्य आणि मध्यम लक्षणे, तसेच ज्या रुग्णाला मधुमेह वा इतर आजार असेल अशाच कोरोनाबाधितांसाठी वापर करता येणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आहेत, पण त्यांना कुठलीही लक्षणे नाही, अशा रुग्णांवर या औषधांचा वापर करता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या औषधांचा वापर करण्यापूर्वी रुग्णाला आपल्या सहीचे मान्यतापत्र डॉक्टरांकडे सादर करावे लागणार आहे. रशिया-जपानच्या धर्तीवर भारतातील सौम्य-मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना याचा फायदा होईल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.
रशिया, चीन आणि जपानमध्ये ही औषधे उपयोगी ठरली आहेत. पण इंग्लंड आणि अमेरिकेत मात्र या औषधाला मान्यता नाही. हे औषध जपानमध्ये 2014 पासून वापरले जात असून ते अँटीव्हायरल आहे. सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णाला पहिल्या दिवशी सकाळी 9 गोळ्या, रात्री 9 गोळ्या घ्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवसापासून सकाळी 4 गोळ्या आणि रात्री 4 गोळ्या, अशा 14 दिवस या गोळ्या घ्याव्या लागणार आहेत, असेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले आहे. दरम्यान, एका गोळीची किंमत 103 रुपये असल्याने रुग्णांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
फेविपिरावीर या औषधामुळे रुग्णाचा ताप सहा दिवसांऐवजी तीन दिवस ताप राहीस,असे म्हटले जात आहे. तसेच विषाणू शरीरात टिकण्याचा कालावधी कमी होतो. म्हणजे जिथे कोरोनाचा विषाणू शरीरात 11 दिवस राहत असेल तिथे या औषधामुळे विषाणू 5 दिवसच शरीरात राहील, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
...तर रुग्णांच्या आरोग्याला जास्त धोका -
आरोग्य सचिवाकडून, आरोग्य विभागाकडून फेविपिरावीरच्या वापरासंबंधी परवानगी आणि मार्गदर्शक तत्वे येणे बाकी आहे. पण असे असले तरी या औषधाचे इतरही सामाजिक दुष्परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कारण भारतात औषधावर कडक नियंत्रण अद्याप नाही. त्यामुळे या औषधांचा काळा बाजार होण्याची शक्यता अधिक आहे. औषधे चढ्या किंमतीने विकली जातील. ज्यांना या औषधाची अजिबात गरज नाही त्यांनाही औषधे दिली जातील. भारतात वेगवेगळ्या पॅथीचे डॉक्टर असल्याने ज्यांना कोरोनाबाबत काही माहित नाही, असेही डॉक्टर हे औषधे रुग्णांना देतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास कोरोना बरे करणारे हे औषधच रुग्णांच्या आरोग्याला धोका पोहोचवेल. त्यामुळे या औषधांच्या वापरावर कडक नियंत्रण सरकारने ठेवावे, औषधाच्या वापरासंबंधीचे मार्गदर्शक तत्वेही कडक करावी, अशी मागणी डॉक्टरांकडून होत आहे.