मुंबई - आजपासून राष्ट्रीय मार्गांवर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे. मात्र, मुंबईच्या एंट्री पॉईंटवर मात्र सध्यातरी सर्वसामान्य पद्धतीने टोल वसुली करण्यात येत आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर सध्यातरी फास्टटॅग हा अनिवार्य करण्यात आलेला नाही. एमएसआरडीसीच्या अंतर्गत मुंबईच्या एंट्री पॉईंट्स वरील टोलनाके येतात. सध्या फक्त दोन लेन या फास्टटॅग साठी ठेवण्यात आलेल्या आहेत. तर इतर लेनमधून सर्वसामान्य पद्धतीने टोलवसुली केली जात आहे. याबाबत ईटीव्ही भारतने मुलुंडच्या आनंद नगर टोलनाक्यांवरून याचा आढावा घेतला.
लोकांमध्ये डबल शुल्काची धास्ती -
जर फास्टट्रॅक नसेल तर डबल टोल भरावा लागेल, असा जो नियम आहे तो राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आज पासून लागू झाला आहे. मात्र, राज्यमार्गावर अजूनही डबल शुल्क हे लागू नसले तरी लोकांमध्ये भीती असल्यामुळे टोलनाक्यावर फास्ट टॅग काढण्यासाठी गर्दी होत आहे.
हेही वाचा - 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्त अमृता फडणवीसांचं ‘ये नयन डरे डरे’ प्रदर्शित
फास्टटॅग म्हणजे काय -
फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर असून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी (RFID) तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल. सध्या रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो.
असे विकत घ्या फास्ट टॅग?
फास्ट टॅग कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येणार आहे. फास्ट टॅग खरेदी करत्यावेळी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. काही बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.