मुंबई - बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'मध्ये जानेवारीत महिन्यात शिरण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याला पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले होते. नंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्याला न्याय देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप न्याय न मिळाल्याने पुन्हा एकदा तो शेतकरी आज आपल्या मुली व पत्नीसह मातोश्रीबाहेर उपोषणासाठी आला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण -
पनवेलमधील शेतकरी महेंद्र देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जानेवारी महिन्यात मातोश्रीवर आले होते. मात्र, बराच वेळ होऊनही भेट होत नसल्याने त्यांनी मातोश्रीच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवत मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांना पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. याला शेतकऱ्याने विरोध केला. अखेर पोलिसांनी मुलीसह शेतकऱ्याला ताब्यात घेतले. संबंधित शेतकऱ्याला चौकशीसाठी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले होते.
कर्जाला कंटाळला आहे शेतकरी -
बँकेच्या कर्जासंदर्भात देशमुख हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी या कर्जासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात अर्जही केला होता. त्यावर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून पोचपावतीही देण्यात आली होती. तरीही त्यांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या देशमुखांनी थेट मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांनी या शेतकऱ्याच्या समस्या लवकरात लवकर सोडवू असे, आश्वासन देखील दिले होते. मात्र, बँकेने आपल्या नावावर खोटे कर्ज दाखवले असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. त्यावर अजूनही काही तोडगा निघालेला नाही, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच देशमुख पुन्हा एकदा आपल्या मुली व पत्नीला घेऊन मातोश्रीवर आले. खैरवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले आहे.
आश्वासन दिले मात्र, पूर्ण नाही केले -
बँकेने माझ्यावर लाखो रुपयांचे कर्ज दाखवले आहे. ही सर्व कर्जे खोटी आहेत. याबाबत पुरावे देऊन देखील रायगड पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही. त्यामुळे मी राज्यपालांशी पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवले. गेल्यावेळी मातोश्रीवर मुलीला घेऊन गेलो. त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादाभुसे यांनी आपण या प्रकरणात लक्ष घालून, चौकशीचे आदेश देऊ असे सांगितले. मात्र, अद्याप बँकेला काहीही सूचना मिळालेली नाही. त्यामुळे बँक अजूनही मला त्रास देत आहे. म्हणूनच मी आज पुन्हा मातोश्रीवर आपले प्रश्न घेऊन आलो, असे ईटीव्ही भारतशी बोलताना महेंद्र देशमुख यांनी सांगितले.