मुंबई : सीबीआय अधिकारी ( fake CBI officer ) असल्याचा बनाव करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ( fake CBI ID card ) अटक केली आहे. आरोपी दीपकने सीबीआयचे बनावट ओळखपत्र दाखवून घाटकोपरच्या हॉटेल्समध्ये झडती घेतली होती.
बनावट ओळखपत्र दाखवून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून घाटकोपर येथील हॉटेल, लॉजवर छापा टाकणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तोतयागिरी केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील लॉजवर आरोपी सोमवारी शोध मोहिमेसाठी गेला होता. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने तेथील कर्मचाऱ्यांना सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले. त्यानंतर त्याने लॉजमधील ग्राहकांची नोंदवही तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने ग्राहकांच्या खोलीत जाऊन तपासणी करण्यास सुरूवात केली.
आरोपी मानखुर्द येथील रहिवासी ग्राहकांच्या ओळखपत्रांचे छायाचित्र घेण्यास सुरूवात केली. त्याच्या वागण्यावरून आरोपी सीबीआय अधिकारी नसल्याचे एका ग्राहकाच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार लॉजमधील कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांना दूरध्वनी करून याबाबतची ( Fake CBI raid on hotel ) माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर येऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील ओळखपत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. दीपक मोरे अशी आरोपीचे नाव आहे. तो मानखुर्द येथील रहिवासी आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.