मुंबई - जवळपास दुपारी अडीच ते ३ वाजले होते. जेवण करून बसलो होतो. तेवढ्यात लोकांचा आरडाओरडा सुरू झाला. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यामधून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, इमारतीच्या खालच्या भागातून धूर येत असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी सर्वांनी गच्चीवर धाव घेतल्याचे एमटीएनएलच्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विभागात कार्यरत असलेले पंकज मेश्राम म्हणाले.
वांद्रे येथे एमटीएनएल (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड)ची इमारत आहे. आज या इमारतीला जवळपास ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. जीव वाचवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी गच्चीवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाने इमारतीमध्ये अडकलेल्या ८४ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. तसेच शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी गच्चीवर अडकलेल्या सर्वांना शिडीने खाली आणले. त्यामधून सर्वांत शेवटी खाली मी आणि माझा सहकारी नितीन भोळे खाली उतरलो. यामध्ये सर्वांत जास्त महिला कर्मचारी गच्चीवर होत्या, अशी आपबीती पंकज यांनी सांगितले.