मुंबई - राज्य सरकारने पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या उच्च न्यायालयातील जामिनाला विरोध केला आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही याप्रकरणी सर्व कागदपत्र न्यायालयात सादर करू, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. 'आम्ही काही पीडितांचा जबाबही नोंदवला आहे', असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर याप्रकरणी एकतर्फी निकाल देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारला राज कुंद्राच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर याप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी 29 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी -
पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
- राज कुंद्राच्या कोठडीत वाढ -
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आज (मंगळवार) राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी किला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.