मुंबई - जनतेचा कौल मिळवण्यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपला यश आले आहे. २०१४ ची पुनरावृत्ती करत २०१९ ला भाजपने राज्यासह देशात घवघवीत यश मिळवले आहे. ३४८ जागा भाजपप्रणीत आघाडीला मिळाल्या आहेत. तर राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकण्यात युतीला यश आले आहे. मात्र, यावेळी राज्यात दोन माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
गड राखण्यात अशोक चव्हाणांना अपयश
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना यावेळी नांदेडमधून पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचा भाजपचे प्रतापराव पाटील यांनी ४० हजार १४८ मतांनी पराभव केला आहे. अशोक चव्हाणांचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मिळालेली मते
प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) - ४,८६,८०६
अशोक चव्हाण (काँग्रेस) - ४,४६,६५८
यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी) -१,६६,१९६
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी तब्बल १ लाख ६६ हजार १९६ मते मिळाली. त्यांच्या या मतांचा अशोक चव्हाणांना फटका बसला आहे.
सोलापुरकरांचा सुशिलकुमारांना पुन्हा चकवा
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डॉ. जयसिद्धयेश्वर शिवाचार्य यांनी त्यांचा तब्बल १, ५८ हजार ५९८ मतांनी पराभव केला. सुशीलकुमार शिंदेचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिंदेचा हा सलग दुसरा पराभव आहे. २०१४ साली त्यांना भाजपच्या शरद बनसोडे यांनी पराभूत केले होते.
मिळालेली मते
डॉ. जयसिद्धयेश्वर शिवाचार्य (भाजप) - ५,२४,९८५
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) - ३,६६,३७७
अॅड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) -१,६९,५२३
अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन्ही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहीलेले नेते आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी हे दोघेही आहेत. २०१४ मध्ये राज्यात ४८ पैकी काँग्रेसला २ जागांवर विजय मिळवता आला होता. त्यामध्ये नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव हे निवडूण आले होते. यावेळी मात्र, काँग्रेसला राज्यात एकच जागा मिळाली आहे. चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रसचे बाळू धानोरकर यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला आहे.