मुंबई - अयोध्येतील राम मंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबईतील वडाळाचे राम मंदिर प्रतिअयोध्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. लॉकडाऊनमुळे सध्या मंदिर भाविकांसाठी खुले नसले तरी रामजन्मभूमी पूजनाच्या पार्श्वभूमीवर वडाळ्यातील राम मंदिरात मोठ्या उत्साहात पूजा आरती करण्यात आली. या निमित्ताने पूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या रोषणाईने आणि रांगोळ्यांच्या सुंदर रंगानी रंगून गेला होता.
श्री राम मंदिर मुंबईच्या वडाळा भागात आहे. हे मंदिर आपल्या अतुलनीय वैभवासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या वडाळा उपनगरातील श्री राम मंदिराची स्थापना 1965 मध्ये द्वारकाचे तत्कालीन गुरु श्री द्वारकानाथ यांनी केली होती. मंदिरात स्थापित राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती काळ्या दगडाने बनविलेल्या आहेत. ज्याची सुंदरता डोळे विस्मित करते. मंदिरात स्थापित सर्व देवता दक्षिण भारतीय शैलीत आहेत.