मुंबई - चार वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर, 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता लाईव्ह आले. त्यांनी अचानक नोटबंदीची घोषणा केली. ही नोटबंदी अयशस्वी झाली तर तुम्ही सांगाल त्या चौकात शिक्षा भोगायला तयार आहे असा, विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांचा हा विश्वास खोटा ठरल्याचे चित्र आहे. नोटबंदीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या काळात देशात रोख वापर कमी झाला नाही. तर तो विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
चार वर्षांपूर्वी नोटबंदीची घोषणा-
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली. 500 आणि 1000 च्या नोटा बेकायदेशीर ठरल्याचे सांगितले. म्हणजेच या नोटांचा वापर थांबवण्यात आला होता. त्यावेळी काळा पैसा पकडला जाईल, रोकड व्यवहार कमी होतील, अतिरेकी कारवाया कमी होतील, डिजिटल व्यवहार वाढतील, अशी कारणे सांगण्यात आली. मात्र आताचे चित्र वेगळे आहे.
विक्रमी रोख व्यवहार -
नोटाबंदीपूर्वी 4 नोव्हेंबर, 2016 रोजी देशातील एकूण चलन 17.97 लाख कोटी रुपये होते. नोटाबंदीनंतर लगेच काही महिन्यांत त्यात नक्कीच मोठ्या प्रमाणात घट झाली. पण आता ती पुन्हा नव्या विक्रमापर्यंत पोहोचली आहे. नोटाबंदीनंतर जानेवारी 2017 मध्ये देशातील चलन 7.8 लाख कोटी रुपयांवर आले होते.
चलनात 10,441 कोटींनी वाढ -
नंतर, सरकार आणि रिझर्व्ह बँकेने रोख रकमेचा कमी वापर आणि अधिकाधिक कॅशलेस आणि डिजिटल व्यवहाराचा आग्रह धरला. परंतु अलीकडील आकडेवारीवर नजर टाकल्यास 23 ऑक्टोबर 2020 च्या पंधरवड्यात देशातील चलनाची एकूण किंमत 26.19 लाख कोटी रुपये होती. जी आजपर्यंतची रेकॉर्डब्रेक आहे. 4 नोव्हेंबर, 2016 च्या पातळीपेक्षा हे 45.7 टक्के किंवा 8.22 लाख कोटी रुपये जास्त आहे. केवळ 23 ऑक्टोबरच्या पंधरवड्यात जनतेच्या चलनात 10,441 कोटींनी वाढ झाली आहे.
हेही वाचा- 'दलाई लामांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा', 'या' माजी मुख्यमंत्र्यांनी केली मागणी