मुंबई - मुंबईत रस्त्यावर कोठेही वाहने पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सोयीची, सुरक्षित व परवडणारे वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना केली जाणार आहे. निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यासाठी स्थायी समितीत मंजुरी मिळाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
स्थायी समितीत मंजुरी -
वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती
मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनतळाची समस्या बिकट होत चालली आहे. या समस्येचे निराकरण करण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी सोयीची, सुरक्षित व परवडण्यासारखे वाहनतळ योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील व रस्त्यालगतच्या वाहनतळांचे व्यवस्थापन, नियोजन आणि नियंत्रण करण्याकरिता महापालिका स्तरावर वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करावी अशी शिफारस यापूर्वीच करण्यात आली आहे. यासाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त यांची वाहनतळ आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
असे असेल तज्ज्ञांचे काम -
वाहनतळ प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी असणाऱ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास व मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची संस्थात्मक निर्मिती करणे. सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील वाहनतळ व्यवस्थापन विषयक आराखडा तयार करणे, वाहनतळ दर निश्चितीबाबत धोरण व अभ्यास, वाहतूक चिन्हे व फलक यासंबंधीची कार्यवाही, वाहनतळाच्या अनुषंगाने विविधस्तरीय संवाद साधणे व वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, वाहन व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित संगणकीय बाबींचा अवलंब करणे, शहरातील शासकीय, व्यवसायिक व निवासी इमारतींमधील वाहनतळ जागांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने वाहनतळ विषयक माहितीचा साठा तयार करणे, वाहन विषयक बाबींची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने 'वाहनतळ मार्शल' यांची नेमणूक करण्याविषयी अभ्यास भंगार झालेल्या किंवा वापरात नसलेल्या वाहनांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, भूमिगत वाहनतळ तसेच उड्डाणपुलाखालील जागांचा वापर याबाबत अभ्यास करणे.
हेही वाचा-भाजपा आमदाराच्या मर्सिडीज कारवर हल्ला; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू