मुंबई : गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या आईसह विनाकारण कारागृहाच्या चार भिंतीआड राहणाऱ्या चिमुकल्यांना आता पोलादी पिंजरा सोडून मोकळ्या वातावरणात बालपण जगता येणार आहे. या मुलांना आपले बालपण मनसोक्त जगता यावे, त्यांच्या बालमनावर सकारात्मक परिणाम होऊन योग्य दिशेने वाटचाल व्हावी यासाठी कारागृह विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला कैद्यांच्या मुलांसाठी खुशखबर असल्याची माहिती मिळत आहे. महिला कैद्यांच्या मुलांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी भायखळा कारागृहात पहिल्यांदाच नन्हें कदम बालवाडी सुरू करण्यात आली आहे तसेच तेथे हिरकणी कक्षाची ही स्थापना केली आहे.
मुलांना प्राथमिक शिक्षण : भायखळा कारागृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार भायखळा जिल्हा कारागृहात 350 महिला कैदी बंदिस्त आहेत. शून्य ते सहा वयोगटातील जवळपास 14 ते 15 लहान मुले आपल्या आईसोबत कारागृहात दाखल आहेत या लहान मुलांना दररोज कारागृहाबाहेरील वातावरणात शिक्षणाची संधी मिळावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत महिला सेविका आणि मदतनीस यांची नेमणूक करून कैद्यांच्या लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते.
बालवाडीसोबत हिरकणी कक्षाचे उद्घाटन : कारागृह परिसरामध्ये कारागृहाच्या बाहेर महिला कैद्यांच्या आणि कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी नन्हें कदम बालवाडी आणि हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बालवाडी आणि हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी अमिताभ गुप्ता यांच्यासह कारागृह दक्षिण विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी राज्य कारागृह विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर कारागृहात नवनवीन उपकम राबविण्यास सुरुवात केली आहे.
कारागृहातील पहिली बालवाडी : कारागृह प्रशासनाने कैदी महिलांच्या चिमुकल्यांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अशा बालकांसाठी भायखळा महिला कारागृहाबाहेर 'नन्हे कदम बालवाडी' आणि 'हिरकणी कक्ष' तयार केला आहे. त्याचे उद्घाटन अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते पार पडले. यावेळी दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई तसेच नितीन वायचळ, पल्लवी कदम आदी उपस्थित होते. राज्यात प्रथमच कारागृहाबाहेर कैदी महिलांच्या बालकांसाठी बालवाडी सुरू करण्यात आली आहे.
बालवाडी कारागृह परिसरात : सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत बालकांना बालवाडीत ठेवण्यात येईल, तिथे सर्वसामान्य बालकांप्रमाणे त्यांचा सांभाळ होईल, त्यांना शिक्षणाची गोडी लावली जाईल. विशेष म्हणजे कैदी महिलांच्या पाल्यांसोबत कारागृहाच्या महिला कर्मचाऱ्यांच्या लहान बालकांना ठेवण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यांदाच कैदी महिलांच्या बालकांसाठी कारागृहाबाहेर बालवाडी सुरू केली आहे. यामुळे जास्तीत जास्त वेळ बच्चेकंपनी चार भिंतीऐवजी तेथील मोकळ्या वातावरणात राहतील. बालकांची सकारात्मक वाटचाल होईल आणि भविष्यात त्याचा त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होईल, असे कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही मिळणार आधार : महिला कैद्यांच्या मुलांसोबतच महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था उपलब्ध झाली आहे अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये राबवण्यात येत आहे या उपक्रमांमध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.