मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या ताणतणावानंतर आता आनंदाचे क्षण घरात आले आहेत. राऊत यांची कन्या पुर्वशी राऊत हिचा साखरपुडा मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पूत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी पूर्वशी यांचा विवाह निश्चत झाला आहे. राऊत यांचे राजकीय वजन पाहता या सोहळ्याला महाविकास आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती पहायला मिळाली.
कोण आहेत राजेश नार्वेकर -
राजेश नार्वेकर हे सध्या ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी काम केले आहे. 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे.
राऊतांचे जावई आयटी इंजीनियर -
राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. तर, पुर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन येथे त्यांचे ऑफिस आहे.
अनेक बड्या नेत्यांची होती उपस्थिती -
संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आदित्य ठाकरे, भाजपाचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते.
फडणवीस-राऊतांची गळाभेट -
महाराष्ट्रात राजकीय वैर कितीही असले तरी याचा वयक्तिक संबंधावर काही परिणाम होत नाही. ही महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी खासियत आहे. आज देखील संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुडा सोहळ्यात याचा प्रत्यय आला. काही महिन्यांपासून एकामेकांविरोधात आग ओकणारे राऊत आणि फडवणीस या सोहळ्यात एकमेकांची गळाभेट घेताना दिसले.