पालघर - शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून AB फॉर्म दिला असून शर्मा हे नालासोपारा येथून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. आता नालासोपारा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेविरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
हे ही वाचा - अर्जुन खोतकरांना शिवसेनेकडून मिळाला सातव्यांदा एबी फॉर्म
एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मांनी 4 जुलैला पोलीस दलाचा राजीनामा दिला होता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार-नालासोपारा भागात वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीला शह देण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रदीप शर्मा यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा AB फॉर्म दिला असून त्यांना शिवसेनेतर्फे नालासोपारा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे.
हे ही वाचा - महायुतीची घोषणा : फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात, फॉर्म वाटप सुरू
कोण आहेत प्रदीप शर्मा -
एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांनी 312 एन्काऊंटरमध्ये भाग घेत 100 हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहेत. शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशात झाला असला तरी त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातल्या धुळे येथे पूर्ण झाले. एमएससी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या प्रदीप शर्मांनी अल्पावधीतच वरिष्ठ पोलीस निरीक्षकापर्यंत बढती मिळवली. कुख्यात गुंडांशी संबंध असल्याच्या संशयावरून प्रदीप शर्मांना 2008 मध्ये सेवेतून निलंबीत करण्यात आले. मात्र, सबळ पुराव्याअभावी प्रदीप शर्मांना क्लीनचिट मिळाली. 9 वर्षांच्या दिर्घ कालावधीनंतर 2017 मध्ये प्रदीप शर्मा पोलीस सेवेत पुन्हा रूजू झाले. प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली. त्यांनंतर विधानसभेच्या तोंडावर प्रदीप शर्मांनी तडकाफडकी राजीनामा दिला.
हे ही वाचा - शिवसेना ५०-५० फॉर्म्युलावर ठाम; भाजप-सेना जुळे भाऊ - संजय राऊत