मुंबई - आजाद मैदानात मागील 47 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजातील तरुणांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार विनायक मेटे यांनी भेट घेतली. आंदोलनाला बसलेल्या मराठा तरुणांच्या मागण्या रास्त असून काही कायदेशीर आणि तांत्रिक अडचणीमुळे मागण्या पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. यावर लवकरच तोडगा काढण्याचे राज्य सरकार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असून लवकरच सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानंतर आजाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
भाजप सरकारने राज्यात मराठा आरक्षण लागू केल्यानंतर या विरोधात अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. मराठा आरक्षण कायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील 55 सरकारी विभागात नोकरभरती सुरू झाली. मात्र, सात महिने नियुक्ती पत्र न मिळाल्याने काही तरुणांनी आजाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते. त्यांची महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी भेट घेतली. या आगोदर 2 मार्चला छत्रपती संभाजी राजे यांनी आजाद मैदानावरील आंदोलकाची भेट घेऊन राज्य सरकारवर टीका केली होती .
हेही वाचा - शेतकऱ्यांना दिलेलं वचन सरकार विसरलं... कर्जमाफीवरून निशाणा
राज्यात सुरवातीला जे आरक्षण दिले गेले होते, त्यावेळी १६ टक्के आरक्षणामधून ३ हजार ५०० तरुणांना नोकरीसाठी बोलावणे आले मात्र, त्यांना काम मिळाले नाही. त्यांना न्याय कुणी द्यायचा ? हे सरकार कोण चालवते, मुख्यमंत्री की अधिकारी? असा सवाल संभाजीराजेंनी केला होता.