मुंबई Chief Minister Eknath Shinde : दिवाळी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांसह एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्यानं घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 वरून शेवटची मेट्रो आता 10:30 ऐवजी रात्री 11 वाजता सुटणार आहे. तसंच दिवाळीनिमित्त एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना 42 हजार 350 रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याच्या प्रस्तावालादेखील मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. हे सानुग्रह अनुदान ( Diwali Bonus) सर्व संवर्गातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
मेट्रोबाबत नवीन निर्णय : मेट्रो 2 अ आणि 7 यामध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये अगोदरच मेट्रो रेल्वे प्रशासनाकडून वाढ करण्यात आली होती. परंतु आता दिवाळीचा सण पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देत एक नवा निर्णयदेखील जारी केला. मेट्रो आता रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार आहे. येथून पुढे कायम तीच वेळ असणार आहे, असं ते म्हणाले. तसंच एमएमआरडीएचा अध्यक्ष या नात्यानं हा निर्णय घेतला असल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव अनुदान जाहीर केल्यानं एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी या वाढीव सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. यासंदर्भात त्यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन भावना व्यक्त केल्या. तसंच याविषयी प्रतिक्रिया देत डॉ. मुखर्जी म्हणाले की, सानुग्रह अनुदानाचा हा निर्णय म्हणजे एमएमआरडीएच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच ठरेल. कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात जाईल, ते प्राधिकरणाच्या कामात अजून उत्साहानं योगदान देत राहतील.
हेही वाचा -
- Mumbai Air Pollution : मुंबईतील रस्ते धुण्यासाठी हजार टँकर्स कामाला; विशेष पथकं तयार, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
- Hema Malini traveled by metro : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी आधी केला मेट्रो प्रवास, मग घेतला ऑटोचा आनंद, पहा व्हिडिओ
- Mumbai Metro Line 3: चर्चगेट ते विधानभवनपर्यंतच्या भुयारी मेट्रो मार्गाची केली मुख्यमंत्र्यांनी पाहणी; मुंबई मेट्रो 3 धावणार डिसेंबरमध्ये