अहमदनगर - भाजपच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर गेलेले खडसे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आले होते. पाच वर्षांपूर्वी शिवसेना, भाजपाची युती तुटल्याची घोषणा करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून काहीसे लांब आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना, भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मी मोठा राहिलेलो नाही, असे म्हणत त्यांनी मनातली खंत अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. तसेच महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - जर्मनीसह रशियातील 23 नागरिकांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून खडसे राजकारणापासून चार हात लांब राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसेंना तिकीट नाकारले होते. त्यानंतर खडसे समर्थकांची नाराजी समोर आल्यावर पक्षाने त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचाही निवडणुकीत पराभव झाला. मतदारसंघात रोहिणी खडसें विरुद्ध इतर सर्व असा सामना झाल्यामुळेच हा पराभव झाल्याचे खडसेंनी निकालानंतर म्हटले होते.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने टोल कंपनीला आली जाग; इंदूर पुणे मार्गावर डागडुजीला सुरुवात
महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिला आहे. सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे, युतीचे सरकार यावे, त्यामुळे युतीचे सरकार येईल, सत्ता स्थापनेसाठी 2 दिवस राहिले आहेत. येत्या दोन दिवसात तणाव मिटेल, असे खडसे यांनी सांगितले. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे सरकार येईल का? अशा जर-तरच्या प्रश्नांना अर्थ नसल्याचे देखील खडसेंनी सांगितले.