मुंबई - सत्ताधारी असूनही अनेकदा मी विरोधी पक्षाच्या नेत्यांप्रमाणे बोलतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी पक्ष सोडतो की काय? असे वाटते. मात्र, मी विखे पाटलांची परंपरा चालवणार नाही, असे मुख्यमंत्री आणि माझ्यात ठरले आहे, असे सांगत माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जोरदार बॅटिंग केली. खडसेंच्या भाषणाने विधानसभेत एकच हास्यकल्लोळ उडाला.
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नवे विरोधी पक्ष नेते म्हणून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड जाहीर केली. वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर बोलताना खडसे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
एकनाथ खडसे यांनी नवे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना शुभेच्छा देताना सांगितले की, सरकार बहुमताच्या जोरावर काहीही करत असेल तर त्यावर अंकुश ठेवून आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्याने लोकांची भूमिका मांडली पाहिजे. खडसे पुढे म्हणाले, माझ्या पक्षाने माझ्या वरही 5 वर्षे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली होती. हे सरकार सत्तेवर येण्यामध्ये विरोधी पक्ष नेते पदाच्या कामाचा खारीचा वाटा आहे, असे सांगत त्यांनी आपल्या मनातील भावना मांडल्या.
तत्पूर्वी विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खडसे यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला होता. पवार म्हणाले की, विरोधी पक्ष नेते म्हणून खडसे यांनी उत्तम काम केले. पण खडसे यांना आता चांगली संधी का मिळत नाही? याचे कारण केवळ खडसे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनाच माहीत असेल. यावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी भाजपला मिळालेल्या सत्तेत आपला खारीचा वाटा असल्याचे सांगितले. त्याबरोबरच त्यांनी मी पक्ष सोडणार नाही, असे माझे आणि मुख्यमंत्र्यांचे ठरले आहे, असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
शिवसेना-भाजपच्या युतीत सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरही भाष्य करताना खडसे यांनी नेमके काय ठरलय हे कळाले तर कसलाही घोळ होणार नाही, असे सांगितले. वडेट्टीवर यांना कमी कालावधीत मोठा ठसा उमटवायचा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाला न्याय देत जनतेच्या प्रश्नावर काम करावे, असेही खडसे यांनी सांगितले.