मुंबई - गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने ( Increase in measles cases ) वाढत आहे. आतापर्यंत एकूण १६९ रुग्णांची तर २६२३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवंडीमधील एका ६ महिन्याच्या मुलीचा भिवंडी ठाणे येथे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ ( Eighth death due to measles ) झाला आहे. ३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. १०५ रुग्ण रुग्णालयात, २
रुग्ण व्हेंटिलेटवर - एम इस्ट गोवंडी विभागात १ लाख ६१ हजार ७३७ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. मुंबईत २१ लाख ५१ हजार २४ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले २६२३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १६९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ० ते ८ महिन्याचे १४, ९ ते ११ महिने ७, १ ते ४ वर्ष ५२, ५ ते ९ वर्षे २१, १० ते १४ वर्षे ६, १५ आणि त्यावरील ५ असे एकूण १०५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवर २ रुग्ण आहेत तर ३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १२ हजार ८७० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत ८ संशयीत मृत्यू - २६ ऑक्टोबर पासून मुंबईत ७ मृत्यू झाले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात ४, राजावाडी २, आणि १ घरी मृत्यू झाला होता. गोवंडी येथील सकिना अन्सारी या ६ महिन्याच्या मुलीचा १३ नोव्हेंबरला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १७ नोव्हेंबरला तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलीला तीच्या पालकांनी भिवंडी ठाणे येथे नेले होते. त्यांनी याबाबतची माहिती दिली नव्हती. या मुलीच्या लसिकरणाबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. यामुळे मृतांची संख्या ८ झाली आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
लसीकरण, जनजागृतीवर भर - मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे. धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे. गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.