मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 'मैं भी चौकीदार' म्हणत मते मागितली जात आहेत. मात्र, सरकारच्या जीएसटी धोरणामुळे देशभरातील सुरक्षारक्षकांच्या रोजगारावर संकट आले आहे. जीएसटीमुळे चौकीदारांच्या रोजगारात ५ ते १० टक्के कपात होऊन बेरोजगारी वाढल्याचे सुरक्षारक्षकांच्या संघटनेचे म्हणणे आहे.
देशभरात जवळपास ७० लाख खासगी सुरक्षा रक्षक असून या सुरक्षा रक्षकांना मिळणाऱ्या वेतनावर १८ टक्के जीएसटी लावण्यात येत असल्याने याचा परिणाम सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्यांच्या नोकरीवर होत आहे. या संदर्भात रस्त्यावर आंदोलने करण्यात आली. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री अरुण जेटली, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे 'सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया'कडून सांगण्यात आले आहे.
देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर २०१७ पासून सुरक्षा रक्षकाच्या वेतनावर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याने सुरक्षा रक्षकांच्या मागणीत मोठी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. चौकीदाराच्या नावावर भाजपने मत मागण्यावर आमचा आक्षेप नाही, मात्र ज्यांच्या नावावर मत मागितले जातात त्यांच्याच नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या सरकारने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी मागणी सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष गुरुचरन सिंग चौहान यांनी केली आहे.