मुंबई- विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील ८० हजार झोपड्याच्या पुनर्विकास रखडला आहे. या झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) आणि एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) वर आहे. पण दहा वर्षांहून अधिक काळ लोटला तरी पुनर्विकास झालेला नाही. त्यामुळे आता लवकरात लवकर या झोपडपट्ट्यांचे पुनर्विकास मार्गी लावण्याची सूचना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एसआरएला दिली आहे. आठवले यांनी विमानतळाच्या जागेवरील झोपड्यासह रखडलेल्या इतर एसआरए प्रकल्पाचा आढावा. त्यावेळी ते बोलत होते.
दोन टप्प्यात ८० हजार झोपड्यांचा पुनर्विकास
विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील ८० हजार झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन टप्प्यात हा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पण या पुनविकासाला काही मुहुर्त लागत नाहीये. अशात आता विमानतळ प्राधिकरणाचा २३.५ टक्के हिस्सा अदानी समूहाने खरेदी केला आहे. सुमारे १ हजार ६८५ कोटीमध्ये हा हिस्सा खरेदी करण्यात आला आहे. तर लवकरच जीव्हीके समूहाचा ५०.५ टक्के हिस्सा अदानी समूह खरेदी करणार आहे. त्यानुसार येत्या काळात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात ७४ टक्के हिस्सा अदानीचा असणार आहे. एकूणच आता अदानी येणार असल्याने आमच्या पुनर्वसनाचे काय? असा प्रश्न झोपडपट्टीवासीयांना पडला आहे.
सर्व्हे, बायोमेट्रिक करा
अदानी समूहाकडे विमानतळ जाणार असल्याने झोपडपट्टीधारक पुनर्वसनाच्या चिंतेत आहेत. जमिनीचा सर्व्हे करावा, बायोमेट्रिक सर्व्हे करावा आणि शक्य तितक्या लवकर झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर द्यावे अशी सूचना आठवले यांनी एसआरएला यांना दिली आहे . तर विमानतळाच्या जागेवर ४ हजार रहिवासी अपात्र आहेत. या अपात्र रहिवाशांना पात्र करण्यासाठी ही पाऊस उचलावे, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे.