मुंबई : यंदा २६ जानेवारी रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. या विशेष प्रसंगी केंद्राने पाहुण्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून यंदा केवळ ४५ हजार प्रेक्षक प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पोहचू शकतील. जिथे पूर्वी दरवर्षी १ लाख २५ हजार प्रेक्षक कर्तव्य पथावर आमंत्रित केले जात होते. मागे कोरोनाच्या काळात केवळ २५ हजार प्रेक्षक कर्तव्य पथावर पोहचू शकले. अलीकडच्या काळात करोनाच्या संसर्गाची चिंता वाढली असलीतरी सरकारने त्यावर कोणतेही कठोर नियम लागू केले नाही आहेत.
'इजिप्त'चे राष्ट्रपती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे : इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल सीसी हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. इजिप्तची १२० सदस्यांची तुकडी पहिल्यांदाच कर्तव्य पथावर कूच करणार आहे. बीटिंग द रिट्रीट समारंभासाठी एकूण जागांपैकी १० टक्के जागा सामान्य लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांची संख्या १२५० आहे. यावर्षी १६ राज्ये आणि सहा केंद्रीय मंत्रालयांची झलक दाखवण्यात येणार आहे. यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची थीम जन भागीदारीचा विषय आहे. म्हणजे अधिकाधिक लोकांचा सहभाग आणि त्यानुसार सर्व काही आयोजित करण्यात आले आहे.
सर्वसामान्य कामगार विशेष आमंत्रित : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, कर्तव्य पथाचे मेंटेनन्स कामगार, दूध बूथ विक्रेते, भाजी विक्रेते आणि छोटे किराणा विक्रेते या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित असतील त्यांना उजवीकडे पुढच्या रांगेत बसवले जाईल. याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी वैध तिकीट किंवा निमंत्रण पत्रिका असलेल्या प्रेक्षकांना मेट्रो स्टेशन पासून परेडच्या ठिकाणी सहज जाण्याची व्यवस्था सरकार करेल.
३२ हजार तिकिटे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि १२ हजार निमंत्रण कार्ड जारी केले जातील. मात्र काही फिजिकल तिकिटे देखील लोकांना दिली जातील. यावेळी व्हीव्हीआयपी निमंत्रण पत्रिकांची संख्या कमी करण्यात आली आहे. पूर्वी ५० हजार ते ६० हजार पेक्षा जास्त निमंत्रण असायचे. ते आता १२ हजार पर्यंत कमी झाले आहेत. सर्वसामान्यांच्या संख्येत कोणतीही घट करण्यात आली नाही. तसेच यावेळी २३ जानेवारीपासून स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या वाढदिवसानिमित्त लष्करी टॅटू आणि आदिवासी नृत्यांसह या उत्सवाची सुरुवात होईल. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दोन दिवस हे आयोजन होणार आहे.
मेकइन इंडियाचा जलवा : आत्मनिर्भर भारत उपक्रमावर लक्ष केंद्रित करून मेक -इन -इंडियाची काही उत्पादने परेड दरम्यान प्रदर्शित केली जातील. यामध्ये मेन बॅटल टॅंक, एनएजी मिसाईल सिस्टीम, के 9 वज्र ब्रह्मोस, आकाश मिसाइल, ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. गतवर्षीप्रमाणेच बी द रिट्रीट सोहळ्यादरम्यान ड्रोन शोचे आयोजन करण्यात येणार आहे.
विविध कार्यक्रमांची रेलचेल : मिलिटरी टॅटू आणि ट्रायबल डान्समध्ये हॉर्स शो, खुकरी डान्स, गडका मल्लखांब, कलारी पयटू, थंगाटा, मोटरसायकल डिस्प्ले, एअर वॉरियर ड्रिल, नेव्ही बँड, पॅन मोटर आणि हॉट एअर बलून असे कार्यक्रम होणार आहेत. देशभरातून एकूण २० प्रकारचे आदिवासी समूह इथे येणार असून जे कार्यक्रमादरम्यान, "आदी शौर्या" चे प्रतिनिधित्व करणारे आदिवासी नृत्य सादर करतील. या सोबतच बॉलिवूड गायक कैलाश खेर देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. परेड पाहण्यासाठी १९ देशांतील १९८ परदेशी कॅडेट्सना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये ३२ अधिकारी आणि १६६ कॅडेट्सचा समावेश आहे. जे २७ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या एनसीसी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.