मुंबई- शालेय शिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी दिवाळीची सुटी पाच दिवसांसाठी जाहीर करणारा एक जीआर जारी केला होता. मात्र, त्यावर राज्यातील शिक्षण संघटनांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्याच विभागाच्या निर्णयावर यू-टर्न घेतला असून त्यासाठी दिवाळीच्या सुटीचा जीआर २४ तासांत बदलत नवीन जीआर काढला आहे.
दिवाळीच्या सुटीसाठी काढण्यात आलेल्या नवीन जीआरनुसार राज्यात विद्यार्थी आणि शिक्षकांना दिवाळीची सुटी 14 दिवसांची करण्यात आली आहे. ही सुटी उद्या शनिवारी, 7 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ती 20 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या सुटीदरम्यान राज्यातील सर्वच शाळांचे पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतचे सर्व ऑनलाईन वर्ग या काळात बंद राहणार आहेत. शिक्षण विभागाच्या या नव्याने काढण्यात आलेल्या जीआरचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसोबत इतर शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
असा होता पूर्वीचा पाच दिवसांचा जीआर -
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना दिवाळीची सुटी देण्यासाठी 5 नोव्हेंबर 2020 रोजी एक जीआर काढला होता. या शासन निर्णयानुसार दिवाळी सुटी 12 ते 16 नोव्हेंबर अशी केवळ ५ दिवसांची केली होती. याला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. परिणामी त्याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २४ तासात निर्णय बदलून दिवाळीची सुटी 14 दिवसांची केली.
शिक्षणमंत्र्यांनी असा केला खुलासा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अनेक शाळांमध्ये हे शिक्षण अजूनही सुरू आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षण तसेच कोरोना साथीमुळे अनेक दिवस वर्ग बंद राहिल्याने अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी दिवाळी सुटी केवळ ५ दिवस केली होती, असा खुलासा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केला. दरवर्षी दिवाळीच्या १८ दिवस सुट्या असतात. पण कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला होता, असेही त्या म्हणाल्या.
मे महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा -
दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होते. मात्र, कोरोना साथीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा मे महिन्यापूर्वी शक्य नाहीत. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने आहेत. मे महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
शाळा सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील -
शाळा सुरू करण्याबाबत तसेच दहावी व बारावी परीक्षेबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवला आहे. त्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घेतील. दहावी, बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी केला आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यावरचे दडपण कमी झाले आहे. 23 नोव्हेंबरपासून पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.