मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार होता. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. परिणामी राज्य सरकार अडचणीत सापडले असून आज (सोमवार) शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम?
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आम्ही उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक आहे. अंतर्गत मुल्यमापन अशी मागणी होत आहे, पण आम्ही कोर्टात सर्व म्हणणे मांडू. दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नयेत याची आम्ही काळजी घेत आहोत. याबाबत राज्य सरकार लवकरच शासन निर्णय जाहीर करून तो न्यायालयासमोर ठेवणार आहे. असाधारण परिस्थितीत न्यायालय सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी अपेक्षा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश वेळेवर व्हावे असे प्रयत्न करत आहोत. एका आठवड्यात चित्र स्पष्ट होईल, अशी आशा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
दहावीच्या निकालासंदर्भात होणार चर्चा-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णया विरोधात माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. परीक्षा रद्द केल्याचा आदेश काढण्यात आला असला तरी निकालाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. 'तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा करताय का ? असे खडे बोल हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले आहे. त्यानंतर राज्य सरकराच्या दहावी मूल्यांकनाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. नुकते शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा निकालाबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक पडली आहे.