मुंबई - केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिव्यांगांसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यांना दिव्यांग म्हणून लाभ दिला जातो. व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदतही केली जाते. त्यासाठी दिव्यांगांची नोंद होणे गरजेचे असते. मात्र मुंबईमधील दिव्यांग मुलांची नोंदणीच होत नसल्याचा प्रकार राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी उघडकीस आणला आहे.
प्रमाणपत्रासाठी नोंदणीच नाही
मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीमध्ये डॉ. सईदा खान यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे हा प्रकार उघडकीस आणला आहे. मुंबईच्या कुर्ला एल वॉर्ड विभागाच्या अखत्यारित किती दिव्यांग मुले आहेत. त्यापैकी किती मुलांची नोंद झाली आहे, याची माहिती मागवली होती. पालिकेच्या कुर्ला येथील एल विभाग कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण पहिली ते दहावी वर्गामध्ये शिकणाऱ्या ९५० मुलांची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त ३०८ विद्यार्थ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रासाठी नोंद झाली आहे अशी माहिती देण्यात आल्याचे सईदा खान यांनी सांगितले.
हेही वाचा - कंगनाने केला थलायवी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
मोठ्या रुग्णालयात प्रमाणपत्रे द्या
दिव्यांग मुलांची प्रमाणपत्रासाठी नोंद का केली जात नाही याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी राजावाडी रुग्णालयात आणि कूपर रुग्णालय करून त्यांना युडीआयडी कार्ड देण्यात येते. मात्र ही रुग्णालये छोटी आहेत. त्याऐवजी नायर, केईएम, सायन या मोठ्या रुग्णालयात प्रमाणपत्रे दिल्यास तेथे सर्व प्रकारचे डॉक्टर्स आणि विभाग असल्याने प्रमाणपत्रे त्वरित देणे शक्य होईल असते सईदा खान यांनी शिक्षण समितीच्या निदर्शनास आणले.
हेही वाचा - राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, चर्चा मात्र होणार सरकारवर झालेल्या आरोपांची?
जास्त विद्यार्थ्यांना लाभ देण्याची गरज
एकट्या एल विभागात ९५० दिव्यांग विद्यार्थी असतील. त्यापैकी ३०८ विद्यार्थ्यांनाच प्रमाणपत्राचा लाभ मिळाले असेल, तर महापालिकेच्या २४ विभागात किती दिव्यांग विद्यार्थी असतील आणि त्यापैकी किती विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळाली असतील याची आकडेवारी समोर आली पाहिजे. मुंबई महापालिकेच्या छोट्या रुग्णालयात प्रमाणपत्रे न देता मोठ्या रुग्णालयात प्रमाणपत्रे दिल्यास जास्तीतजास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल असे सईदा खान यांनी म्हटले आहे.