मुंबई - मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांकडून होणारा जातीवाचक त्रास आणि रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल यांनी आत्महत्या केली. अशा घटना होऊ नये म्हणून पालिकेकडे अँटी रॅगिंग स्कॉड नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे अँटी रॅगिंग स्कॉड त्वरित बनवले जावे, अशी मागणी भाजपाच्या शिक्षण समिती सदस्य आरती पुगावकर यांनी केली आहे.
रॅगिंगसारखे प्रकार मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या डीएड महाविद्यालायतही घडू शकतात, अशी भीती आरती पुगावकर यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत व्यक्त केली आहे. डीएड महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने महिला शिक्षण घेतात. या महिलांवर पायल सारखी आत्महत्येची वेळ येऊ नये म्हणून अँटी रॅगिंग स्कॉड आहे का? अशी विचारणा पुगावकर यांनी केली. यावर प्रशासनाकडे कोणतेच उत्तर नसल्याने यावर पुढील बैठकीत माहिती सादर केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. डॉ. पायलच्या आत्महत्येची पुनरावृत्ती डीएड महाविद्यालयामध्ये होऊ नये म्हणून अँटी रॅगिंग स्कॉड स्थापन करावे, अशी मागणी पुगावकर यांनी केली आहे.
नायर रुग्णालयामधील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. पायल तडवी यांना (वय २३) स्त्रीरोगतज्ञ् व्हायचे होते. शिक्षण घेताना तिला वरिष्ठ सहकाऱ्यांकडून जातीवाचक आणि रॅगिंगचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबतची तक्रार पायल यांच्या आईने नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्याकडे केली होती. त्यानंतरही त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने पायल यांनी आत्महत्या केली होती. पायल यांच्या आत्महत्येनंतर मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या शहरात जातीवादावरून आत्महत्या करावी लागल्याने राज्यात आणि देशभरात याचे पडसाद उमटले आहेत.