मुंबई- राज्यातील शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन आता एक महिना उलटत आला आहे. त्यातच ऑनलाईन शिक्षण देण्याचा गाजावाजा करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाला अजूनही ते शिक्षण नीट देता न आल्याने त्यासाठी आता गुगल क्लासरुमसाठी शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.यासाठीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील शिक्षकांना यासाठी आपली नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. दोन दिवसांत ५४ हजार ८२४ शिक्षकांनी नोंदणीही केली आहे. उर्वरित शिक्षकांना सोमवारी रात्री ११.३० वाजेपर्यंतच ही नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ही नोंदणी बंद होणार आहे.
गुगल क्लासरुमच्या या ऑनलाईन शिक्षणाच्या पयार्यायामुळे प्रत्येक शिक्षकांला आता 'टेक्नोसॅव्ही' व्हावे लागणार आहे. शिक्षकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गुगल क्लासरुमच्या माध्यमातून जी-सूट आयडी तयार करुन दिला जाणार आहे. या माध्यमातून एक शिक्षक एकावेळी किमान २५० विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका घेऊ शकणार आहे. तसेच या तासिका रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना पाहाण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत.
शिक्षकांना अनलिमिटेड स्टोरेजचे जी-सूट आयडी व सोबत विद्यार्थ्यांनाही काही कमाल मर्यादा असणारे जी-सूट आयडी व पासवर्ड दिले जाणार आहेत. गुगल क्लासरुमच्या माध्यमातून तयार होणारा सर्व डेटा हा केवळ शिक्षण विभागाकडे राहणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
केवळ सोय उपलब्ध असलेल्या शाळांसाठीच....
राज्यातील अजूनही ४३ हजारांहून अधिक प्राथमिक शाळांमध्ये संगणक नाही. ६ हजार ६६० हून अधिक शाळांमध्ये वीजचे कनेक्शन नाही, अशी परिस्थिती आहे. शिक्षण विभागाकडून या शाळांमध्ये वेगळे पर्याय देण्याऐवजी ज्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा, संगणक, लॅपटॉप आदी उपलब्ध आहेत, अशा शाळांतील शिक्षकांनाच गुगल क्लासरुमचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सुट्टीच्या दिवशीही नोंदणीला प्रतिसाद...
गुगल क्लासरुमसाठी शनिवार, रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही ५४ हजार ८२४ शिक्षकांनी या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. यात सर्वाधिक नोंदणी ही ठाणे जिल्ह्यातून ५ हजार ५७९, मुंबई शहर आणि उपनगरातून ४ हजार ६९३, पुणे जिल्ह्यातून ४ हजार ३७७, सातारा जिल्ह्यात ४ हजार ३५९ इतकी झाली असून सर्वात कमी गडचिरोजी जिल्ह्यात २३३, भंडारा जिल्ह्यात ३१३ आणि वर्धा जिल्ह्यात ३६५ शिक्षकांनी आपली नोंदणी केली आहे.