मुंबई: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात सहजपणे माहिती उपलब्ध व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक पोर्टल सुरू केले आहे. युनिसेफ सोबतमिळून सुरू केलेले हे करियर पोर्टल नेमके काय आहे? याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून आता प्रशिक्षणावर जोर देण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २४ मे रोजी मोठा गाजावाजा करत टमहाकरिअर' या पोर्टलचे उद्घाटन केले होते. मात्र, पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याने विद्यार्थ्यांना त्यावर नेमकी माहिती मिळत नव्हती. यातील त्रूटी दूर करण्याची जबाबदारी शालेय शिक्षण विभागाने संबंधित शिक्षण अधिकारी आणि विभागीय कार्यालयावर सोपवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुंबई आणि परिसरात महाकरिअर पोर्टलसाठी प्रशिक्षण सुरू केले आहे.
शिक्षण निरीक्षक कार्यालय, जोगेश्वरी(पू)ने काल 'महाकरिअर' पोर्टलचा वापर कसा करावा, यासाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. यात परिसरातील नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आणि शिक्षक ही सहभागी झाले होते, अशी माहिती शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी दिली.
शालेय शिक्षण विभागाने युनिसेफच्या मदतीने तयार केलेल्या 'महाकरिअर पोर्टल'वर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 556 अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासोबतच या पोर्टलवर 21 व्यावसायिक संस्थांचीही माहिती असून त्याचा नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, मागील काही दिवसात या पोर्टलला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी आणि पासवर्ड विचारत असल्याने अनेकांनी या पोर्टलकडे दुर्लक्ष केले होते. त्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडे तक्रारही गेली होती. त्यात आता सुधारणा करण्यात आली असून विद्यार्थ्यांना या पोर्टलवर सहजपणे माहिती उपलब्ध होत असल्याचे साबळे यांनी सांगितले.