मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून टॅब देण्यात आले. मात्र, त्यापैकी बहुतेक टॅब बंद पडले आहेत. ऐन 10 वीची परीक्षा जवळ आली असतानाही टॅबचा उपयोगच होत नसल्याची धक्कादायक माहिती शिक्षण समितीतून समोर आली. येत्या 9 जानेवारीला होणाऱ्या विशेष सभेत याबाबत माहिती देण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले.
टॅब योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून आहे. पहिल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांपासून टॅब देण्याची योजना सुरू करण्यात आली. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. मात्र, सध्या या योजनेचा बोजवारा उडाला आहे. सुमारे 40 हजार टॅब इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र, यातील बहुतांशी टॅब सध्या बंद असल्याने पडून आहेत. काही टॅबमध्ये एसडी कार्ड नसल्याने त्याचा उपयोग होत नसल्याने हे टॅबही वापराविना आहेत.
इयत्ता 10 वीची परीक्षा जवळ आली असतानाही विद्यार्थ्यांना टॅब नसल्याने अभ्यास करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होते आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले असताना या टॅबच्या दुरुस्तीसाठी नवे कंत्राट दिले जाणार आहे, असे सांगत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समितीत हरकतीचा मुद्दा मांडून याबाबतची वस्तूस्थिती समोर आणली.
पालिका शाळांत देण्यात आलेल्या टॅबची संख्या, किती बंद झाले, किती वापरात आहेत आदी माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी केली. मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी टॅब दिले जातात. मात्र, अभ्यासासाठी मुलांना त्याचा वापर होतच नसेल तर ते गंभीर आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. टॅब देण्याचा उद्देश सफल होत नसेल तर हा उपक्रम राबवून उपयोग काय, असा सवाल नगरसेवकांनी विचारला.
हेही वाचा - 'संविधान बचाओ भारत बचाओ'; मुंबईत काँग्रेसचा तिरंगा मार्च
दरम्यान, टॅबची सद्यस्थिती काय आहे, याबाबत प्रशासनाला उत्तर देता न आल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. टॅब योजनेत काही तरी गोंधळ आहे, याबाबत नगसेवकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान, येत्या 9 जानेवारीला होणाऱया विशेष बैठकीत प्रशासनाने टॅब बाबतच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले.
हेही वाचा - 'वर्षा'तील ठाकरेंबाबतच्या 'त्या' मजकुराची चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी