मुंबई - शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी शरद पवार आज दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाणार होते. दरम्यान, ईडी कार्यालयाकडून शरद पवार यांना मेल द्वारे पत्र पाठविण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या शरद पवार यांच्या चौकशीची आम्हाला गरज नाही, पुढे सुद्धा चौकशीची गरज लागणार नसल्याचे ईडीच्या पत्रात नमूद करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
..मग कोणाच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला - मलिक
ईडी कार्यालयाकडून शरद पवार यांना नुकताच ईमेल आला. त्यात आपण कार्यालयात येऊ नये, चौकशीसाठी आता येण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मात्र, ईडीने कोणाच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयात जाणार असून त्यासाठीची तयारी केली असल्याची माहिती मलिक यांनी दिली.
न्यायालयाने त्यांना कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यामुळे ईडीने कोणाच्या आदेशाने ही कारवाई केली, याची आम्हाला माहिती घ्यायची आहे. त्यांनी आम्हाला बोलावले नाही हे खरे आहे. पण त्यांनी भाजप कार्यालयातून पाठवलेल्या प्रेसनोटनुसार ते कारवाई करतात मग आता का येऊ नको म्हणातात. मग त्यांनी कोणच्या सांगण्यावरून मेल पाठवत आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयात जाणारच आहोत, असेही मलिक म्हणाले.