मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून तपास केला जात आहे. टॉप्स ग्रुपच्या दोन अधिकाऱ्यांना ईडीने अटक केलेली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांची मुले पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना पुन्हा ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दोघेही 23 डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित होण्याची शक्यता आहे.
पूर्वेश सरनाईकला 14 डिसेंबर हजर राहण्याचे मिळाले होते समन्स -
काही दिवसांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई-ठाण्यातील घर व कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती व त्यानंतर विहंग सरनाईक, प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. आतापर्यंत प्रताप सरनाईक यांची चौकशी झाली असून त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यालासुद्धा सोमवारी (१४ डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले होते.
काय आहे प्रकरण?
एमएमआरडीएने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत केलेल्या तक्रारीनुसार, टाॅप्स सिक्युरिटीचे मुख्य भागीदार अमित चंदोले यांनी एमएमआरडीए करता सुरक्षा रक्षक पुरवण्याचे मोठे कंत्राट घेतले होते. त्या कंत्राटाकरता अमित चंदोले आणि कंपनीने १७५ कोटी रुपये घेतले होते. मात्र कोणतीही सुविधा न देता है पैसे अमित चंदोले यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.