मुंबई - टॉप्स ग्रुप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना टॉप्स ग्रुपच्या दोन अधिकाऱ्यांना ईडीने अटक केलेली आहे. यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुद्धा ईडीकडून करण्यात आली. या बरोबरच सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक याला सुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. यावर पूर्वेश यांनी आजारी असल्याचे कारण सांगत चौकशीला हजर राहणे तुर्तास टाळले आहे.
ईडी अधिकाऱ्यांना दिले पत्र-
पूर्वेश सरनाईक यांनी ईडी चौकशीला हजर न राहता आपल्याला ताप आणि खोकला असल्याचे कारण दिले आहे. तसेच डॉक्टरांनी आपल्याला आराम करायचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण आज चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे पत्र पूर्वेश सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
पूर्वेश सरनाईकला 14 डिसेंबर हजर राहण्याचे समन्स
काही दिवसांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई-ठाण्यातील घर व कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती व त्यानंतर विहंग सरनाईक, प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. आतापर्यंत प्रताप सरनाईक यांची चौकशी झाली असून त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यालासुद्धा सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आलेले आहे. मात्र या समन्स बाबत आमदार प्रताप सरनाईक किंवा पूर्वेश सरनाईक या दोघांकडून या गोष्टीला दुजोरा देण्यात आलेला नव्हता.
सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळाल्यानंतर गुरुवारी 10 डिसेंबरला ईडीकडून समन्स आल्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले होते. टॉप्स ग्रुपच्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंगला घेऊन ईडीकडून तपास केला जात होता.
सर्वोच्च न्यायालयाचे कारवाई न करण्याचे आदेश-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या संदर्भात ईडी कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये, अशी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा देत ईडीला कुठल्याही प्रकारची कारवाई आमदार प्रताप सरनाईक किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात करू नये, असे निर्देश दिले आहेत.
टॉप्स ग्रुपच्या 2 जणांना झाली आहे अटक
टॉप सिक्युरिटीचा मालक अमित चांदोले व टॉप्स ग्रुपचा माझी एमडी एम शशी धरण या दोघांना ईडीकडून अगोदरच अटक करण्यात आलेली आहे. एमएमआरडीएला 175 कोटी रुपयांचा चुना लावण्याच्या आरोपाखाली अमित चांदोले यास अटक करण्यात आलेली आहे. तर टॉप्स ग्रुपच्या आर्थिक व्यवहारात विषमता आढळल्याने या ग्रुपचा माजी एमडी एम शशी धरणला ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळेस अधिकाऱ्यांसोबत चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे त्यास अटक करण्यात आलेली आहे.