मुंबई - वसई विरारमधील राजकीय नेते हितेंद्र ठाकूर व त्यांचा भाऊ भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुप या कंपनीच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर पीएमसी बँक घोटाळा संदर्भात ईडीकडून आणखीन एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. ईडीकडून विवा ग्रुपच्या मुंबईतील संपत्तीवर टाच आणण्यात आली असून तब्बल 34 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
34 कोटींची संपत्ती विकली 34 लाखांत -
मुंबईतील अंधेरी परिसरातील कॅलिडोनिया इमारतीतील मॅकस्टारच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पीएमसी बँकेकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेणाऱ्या एचडीआयएल कंपनीचे सारंग वाधवान व राकेश वाधवान यांच्याकडून अंधेरी परिसरात असलेली 34 कोटी रुपयांची मालमत्ता केवळ 34 लाखांत विवा ग्रुप कंपनीला विकण्यात आली होती. एचडीआयल कंपनीची उपकंपनी असलेल्या मॅकस्टार या कंपनीला हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुप कंपनीकडून 37 चेक देण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
नियमबाह्य पद्धतीने हजारो कोटी रुपयांचे कर्ज -
विवा ग्रुप कंपनी ही वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय करीत असून बांधकाम, ट्रॅव्हल, शैक्षणिक, रिटेल सारख्या व्यवसायात सध्या विवा ग्रुप मोठ्या प्रमाणात व्यवसाय करताना दिसून येत आहे. एचडीआयएल कंपनीकडून विवा ग्रुपला जवळपास 200 कोटी रुपये देण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच दिशेने या संदर्भात तपास सुरू आहे. एचडीआयएल कंपनीकडून केवळ पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक कडूनच कर्ज घेण्यात आले नसून येस बँकेकडून सुद्धा नियमबाह्य पद्धतीने हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.
हेही वाचा - तब्बल १३ वर्षे 'अनसोल्ड' राहिलेल्या मुशफिकुरची यंदाच्या आयपीएलमधून माघार