मुंबई BMC Dead Body Bag Scam : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 7 नोव्हेंबरला मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांची कोविड दरम्यान झालेल्या विविध गैरप्रकारांबाबत सुमारे 6 तास चौकशी केली होती. तसंच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना 8 नोव्हेंबरला ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र किशोरी पेडणेकर यांच्या वकीलांनी वाढीव चार आठवड्यांचा वेळ ईडीकडं मागितला होता. त्यानंतर ईडीनं किशोरी पेडणेकर यांना पुन्हा समन्स बजावले असून आज (23 नोव्हेंबर) त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.
निविदा प्रक्रियेत घोटाळा : अंमलबजावणी संचालनालयानं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प), माजी उपमहापालिका आयुक्त (खरेदी/सीपीडी) यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यांच्यावर कोविड काळात मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोविड काळात झालेल्या निविदा प्रक्रियेत किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मुंबईतील कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2 हजार रुपयांऐवजी 68 हजारांना विकत घेतल्याचा आरोप आहे. तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, खरेदी विभागाचे तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार वेदांत इनोटेक लिमिटेड या कंपनीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉडी बॅग घोटाळ्यात गुन्हा दाखल : पेडणेकर यांच्याविरुद्ध बॉडी बॅगमधील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेडणेकर, BMC च्या इतर वरिष्ठ अधिकार्यांवर भारतीय दंड विधानाच्या कलम 409, 420,120B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना महामारीदरम्यान बीएमसीच्या कामकाजातील कथित अनियमिततेच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीनं पेडणेकरांना नोटीस बजावली आहे.
हेही वाचा -