मुंबई : ED Action On Ranbir Kapoor : ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचा पुत्र रणबीर कपूरला ईडीने समन्स पाठवले असून महादेव गेमिंग लॉटरी प्रकरणी चौकशी होणार आहे. ६ ऑक्टोबरला रणबीर कपूरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रणबीर कपूर महादेव अॅपचे प्रमोशन करत होता. ईडीने असा दावा केला आहे की, त्याला या प्रमोशनसाठी मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाली आहे. महादेव अॅपचे संस्थापक असे ४ ते ५ समान अॅप्स चालवत आहेत. हे अॅप युएई मधून चालवले जात असून या अॅपचे कॉल सेंटर्स श्रीलंका, नेपाळ आणि युएईमध्ये आहेत.
करोडोंची अफरातफर झाल्याचा दावा: बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ, गायिका नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यासह अनेक दिग्गज ईडीच्या रडारवर आहेत. भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचंही नाव तपासात समोर आल्याने बॉलीवूड विश्वात खळबळ माजली आहे. बॉलिवूडमधील १४ पेक्षा अधिक नाव ईडीच्या रडारवर आहेत. महादेव बेटींग अॅपच्या माध्यमातून करोडोंची अफरातफर होत असून काही सेलिब्रिटी आणि सरकारी अधिकाऱ्यांना यातून पैसे गेल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रोख रक्कम आणि १३ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला आढळून आले आहेत.
चंद्रकारच्या लग्नाला नामवंतांची उपस्थिती: महादेव बेटिंग अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्रकारच्या लग्नात चित्रपट सृष्टीतले नामवंत व्यक्ती सामील झाले होते. यात सहभागी अभिनेता टायगर श्रॉफ, कृष्णा अभिषेक, पार्श्वगायिका नेहा कक्कड, पार्श्वगायक आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी, कॉमेडियन भारती सिंग, अभिनेत्री सनी लियॉनी, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुसरत भरुचा आदी सेलिब्रिटीही विवाह सोहळ्याला उपस्थित होते. युएईमध्ये विवाह सोहळा झाला. मुंबईतील एका पीआर कंपनीमार्फत मोठी फी देऊन चित्रपट सृष्टीतले नामवंत सोहळ्याला उपस्थित राहिले होते. सौरभ चंद्रकारच्या लग्नासाठी दीडशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा रोखीने व्यवहार झाल्याचा सूत्रांनी दावा केला आहे.
हेही वाचा: