मुंबई - मिठी नदीतून सापडलेला प्रिंटर विनायक शिंदेचा आणि डीव्हीआर सचिन वाझेच्या सोसायटीमधला असल्याचे तपासात समोर आले आहे. मुकेश अंबानी यांना जे धमकीचे पत्र देण्यात आले होते ते शिंदेच्या प्रिंटरमधून टाईप केले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर तपासणी केली होती. यावेळी सचिन वाझेने दाखवलेल्या मिठी नदी जवळील जागेवर फेकून दिलेल्या काही वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न एनआयएकडून करण्यात आला होता. सचिन वाझेने मिठी नदीत फेकून दिलेल्या वस्तूंमध्ये एक प्रिंटर, डीव्हीआर, काही नंबर प्लेट तर एक सीपीयू होता, या सर्व वस्तू एनआयएकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
सचिन वाझेने विनायक शिंदेला दिले होते 50 हजार रुपये
मुंबईत 2007 मध्ये झालेल्या लखनभैया बनावट एन्काउंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला विनायक शिंदे कोरोना संक्रमणामुळे पॅरोलवर बाहेर आलेला होता. एक वर्षासाठी बाहेर आलेला शिंदे सचिन वाझेच्या संपर्कात आला होता. बनावट सीमकार्ड मिळवण्यासाठी वाझेने काही क्रिकेट बुकींना संपर्क केला होता. क्रिकेट बुकीकडून बनावट सीमकार्ड घेण्याचे काम वाझेने शिंदेला दिले होते. यासाठी त्याला 50 हजार रुपये दिल्याचे वाझेने 'एनआयए'च्या चौकशीत सांगितल्याचे समोर आले आहे.
'ती' नंबर प्लेट औरंगाबादच्या इको गाडीची -
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर तपासणी केली आहे. यावेळी सचिन वाझे यांनी दाखवलेल्या मिठी नदी जवळील जागेवर मिठी नदीत फेकून दिलेल्या काही वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न एनआयए कडून करण्यात आला. एनआयएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझेने मिठी नदीत फेकून दिलेल्या वस्तूंमध्ये एक डीव्हीआर, काही नंबर प्लेट तर एक सीपीयू होता. या सर्व वस्तू एनआयएने जप्त केल्या आहेत. यात mh20 1539 या क्रमांकाची नंबर प्लेट आहे. ही नंबर प्लेट औरंगाबाद पासिंगची असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अधिक तपास केला असता हा नंबर मारुती ईको कारचा असून ही गाडी हडको येथील रहिवासी विजय नाडे यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - परमबीर सिंगांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी, १३० पानांच्या याचिकेत आहेत हे मुद्दे