मुंबई - मुंबईच्या रस्त्यावर असलेले ट्रॅफिक आणि रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे मुंबईकर कधीच वेळेवर पोहचू शकत नाही. याचा प्रत्यय खुद्द मुंबईचा कारभार पाहणाऱ्या महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना आला आहे. आयुक्तांना एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी जायचे असल्याने त्यांनी रेल्वेचा मार्ग निवडला. तशी माहिती महापालिकेने सोशल मिडियावरुन दिली आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणारे ट्रॅफिक यावर पालिका आता तरी गांभीर्याने विचार करेल का? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा- शौर्य सैनिकांचे अन् हे स्वतःची पाठ थोपटवतायत - शरद पवार
पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची चर्चगेटला महत्वाची बैठक होती. या बैठकीला नेदरलँड देशातील राजा आणि राणी उपस्थित राहून इंडो-डच करार केला जाणार होता. मात्र, पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या आयुक्तांना आपल्या गाडीने चर्चगेटला वेळेत पोहोचणे शक्य नव्हते. यावेळी खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाली होती. यामुळे आयुक्तांनी राम मंदिर रेल्वे स्थानकातून ट्रेनने चर्चगेट गाठण्याचा निर्णय घेतला.
आपल्या ट्रेन प्रवासाची माहिती आयुक्तांनी ट्विट करून दिली आहे. या माहितीनुसार २ वाजून ४४ मिनिटांची ट्रेन अगदी वेळेवर आली. ट्रेनचा प्रवास ही सुखकर झाला. अगदी वेळेत चर्चगेटला पोहोचता आले. एकप्रकारे मुंबईतील खड्डे आणि वाहतूक कोंडी मधून रेल्वेने आयुक्तांची सुटका केली. आजच्या या घटनेमुळे मुंबईतील रोजची खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या समोर आली आहे. ट्रेन प्रवासामुळे आयुक्तांची यातून सुटका झाली असली तरी मुंबईकरांनी सुटका कधी होईल? असा प्रश्न विचारला जात आहे.