मुंबई : महाराष्ट्र शासनाने एकीकडे इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यानंतर लगेच शासनाने दुसरा निर्णय जाहीर केला आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलै, ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षांच्या नियोजित तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या या परीक्षा आता ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.
अतिवृष्टीचा अंदाज : राज्यामध्ये अतिवृष्टीचा अंदाज शासनाने वर्तवला आहे. त्यानुसार शासनाचे विविध यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत दोन कोटी 25 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. खासगी अनुदानित खाजगी विनाअनुदानित आणि शासकीय व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये या आधीच सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच सर्व माध्यमांच्या शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, आता अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यानंतर नियोजित इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दहावीची परीक्षा दोन ऑगस्टला : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा 20 जुलै 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेमध्ये होणार होती. आता त्या नियोजित वेळमध्ये बदल करून 2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये होणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावीसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या बदललेल्या वेळापत्रकाची दखल घेऊन त्यानुसार आपले नियोजन करावे.
इयत्ता बारावीची परीक्षा आता 11 ऑगस्ट रोजी : इयत्ता बारावीची परीक्षा देखील 20 जुलै रोजी होणार होती. परंतू आता त्यामध्ये देखील शासनाने बदल केला आहे. ही परीक्षा आता 11 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी दोन अशी निश्चित करण्यात आलेली आहे. असा आदेश राज्य परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सायंकाळी उशिरा जारी केलेला आहे.