मुबंई - शहरात अखेर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने बुधवारी सकाळ पासूनच जोर धरला आहे. जोरदार सरी बरसल्याने मुंबईच्या हिंदमाता परीसरात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली असून परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जून महिना संपत असतानाच मुंबई पावसाने हजेरी लावली. दर वर्षी पावसाळ्यात हिंदमाता परिसर पाण्याने तुंबून जातो. महानगरपालिकेकडून हिंदमाता परीसरात पाणी साचू नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जातात तरीसुद्धा परिस्थिती 'जैसे थे' आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. त्या साचलेल्या पाण्यातुन वाट काढत लोकांना ये जा करावी लागत आहे.
शहरात माझगाव चाळ नंबर ५१ A, ताडदेव बीएमसी गॅरेज, पूर्व उपनगरमध्ये सायन सोनापूर गल्ली, शितल टॉकीज, साकिनाका, घाटकोपर पश्चिम बर्वे नगर, पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज बांद्रा, अंधेरी मेट्रो स्टेशन, मिलन सबवे, अंधेरी सब वे आदी ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे नोंद झाल्या आहेत.