मुंबई - राज्यात 'म्यूकरमायकोसिस' आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणाऱ्या या बुरशीजन्य आजारामुळे जिवालाही धोका निर्माण झाला आहे. एकीकडे या रुग्णांची सख्या वाढत असताना दुसरीकडे या आजारावर वापरण्यात येणाऱ्या ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा काळाबाजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या औषधांची किंमत 7 हजार रुपयांच्या जवळपास असून अनेक ठिकाणी ही औषधे 10 ते 12 हजारांपर्यंत विकण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्हा प्रशासनाने या औषधांचा साठा किती आहे, यासंदर्भातील माहिती देण्याचे आदेश औषध विक्रेत्यांना दिले आहेत.
म्यूकर मायकोसिससाठी ३० कोटींचा निधी -
राज्यातील कोरोना परिस्थितीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी म्यूकर मायकोसिस आजार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात आला. म्यूकरमायकोसिसवरील औषधोपचारासाठी तसेच काळाबाजार रोखण्यासाठी ३० कोटींचा निधी उपलब्धा करून देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले. तसेच या औषधांचा काळाबाजार करण्याऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आले आहेत.
जळगावमध्ये ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा तुटवडा -
जळगावमध्ये म्यूकर मायकोसीस या आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या इंजेक्शनच्या साठ्याची माहिती देण्याचे आदेश औषध विक्रेत्यांना दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये, सर्व मेडिकल डिलर्स, किरकोळ विक्रेते यांच्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हे आदेश पारित केले आहेत. तसेच खासगी वितरकांकडे उपलब्ध इंजेक्शन जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषध निरीक्षकांनी, ज्या रुग्णालयात 'म्यूकरमायकोसिस'च्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, अशा रुग्णालयांना आवश्यतेनुसार वाटप करावे, असे आदेशात म्हटले आहे.
औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन -
नागपूरमध्येही म्यूकरमायकोसिस या आजाराचे थैमान वाढत चालले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच काळा बाजार रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या आजारावरील औषधे अगोदरच महागडी आहेत. त्यातच अजून काळाबाजारी करून ती औषधे आणखी अधिक दरात विकली जात आहे. यावर उपाययोजना करून सामान्य नागरिकांना कमी दरात उपचार मिळावेत, यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
ब्लॅक फंगस किंवा म्यूकरमायकोसिस या आजारावर मिळणारे एम्फोटेरेसीन बी हे इंजेक्शन बनवण्याची परवानगी मिळाल्याने आता स्वस्तात औषध उपलब्ध होणार आहे. पण या इंजेक्शन निर्मितीला आणखी 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नागपुरात सध्या 45 पेक्षा जास्त रुग्ण शासकीय दंत महाविद्यालयात तर 11 रुग्ण हे मेयोत रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर या आजारामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रुग्णांचा संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्यावतीने अॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे.