मुंबई- उपनगरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून गांजासारखे अमली पदार्थ विकणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकाच्या बांद्रा युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
अटक केलेले आरोपी हे मुंबई उपनगरातील विविध महाविद्यालयांच्या बाहेर उभे राहून व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून गांजासारखे अमली पदार्थ विकायचे. गेल्या काही महिन्यांपासून ते हे काम करत होते. याप्रकरणी पोलिसांनी सुनील राज देवदास (२९) या आरोपीला शहरातील जुहू तारा रोड येथून १ लाख ८० हजार रुपयांच्या ९ किलो गांजासह अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीच्या चौकशी दरम्यान शहरातील वाडीबंदर येथून अरमान शॉकत शेख या आरोपीला ३ लाख २० हजार रुपयांच्या १६ किलो गांजासह अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे बांद्रा युनिट अधिक तपास करीत आहे.