मुंबई - मुंबई महानगरपालिका ( Mumbai Municipality ) ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नागरिकांना मूलभूत गरजा पुरवणे त्याचसह शिक्षण, आरोग्य सुविधा ( Education, Health Facilities ) पुरवणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य ( Mumbai Municipal Corporation School ) आहे. पालिकेच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १ हजार १५० शाळा असून स्वतःच्या मालकीच्या ४६७ शालेय इमारती आहेत. यात ३ लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांची अवस्था, देण्यात येणारे शिक्षण यामुळे गेल्या काही वर्षापर्यंत शिक्षणाचा दर्जा घसरला होता. त्यातच मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने पालिकेच्या मराठी, इतर भाषेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली.
अशी झाली गळती कमी - २०१२ - १३ मध्ये ४० हजार ११ विद्यार्थ्यांची गळती होती. त्यावेळी १०० मध्ये गळतीचे प्रमाण ९ इतके होते. २०१५ - १६ मध्ये ५७ हजार ७८८ विद्यार्थ्यांची गळती होती. त्यावेळी १०० मध्ये गळतीचे प्रमाण १५ इतके वाढले होते. त्यानंतर गळतीचे प्रमाण कमी झाले. २०१९ - २० मध्ये १० हजार ५५० विद्यार्थ्यांची गळती होती. त्यावेळी १०० मध्ये गळतीचे प्रमाण ४ इतके होते. २०२१ - २२ मध्ये ३ हजार ९७७ विद्यार्थ्यांची गळती होती. त्यावेळी १०० मध्ये गळतीचे प्रमाण १ इतके खाली आले होते.
यामुळे विद्यार्थी गळतीची संख्या कमी झाली - मुंबई महानगर पालिकेने शहरामधील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले. यासाठी पालिकेने मिशन ऍडमिशन, मिशन झिरो ड्रॉपआउट राबवण्यात आले यामुळे यंदा पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले. पालिका शाळेतील जे विद्यार्थी शाळेत येत नव्हते त्यांना शाळेत आण्यासाठी घरोघरी शिक्षक, अधिकारी गेले. त्यांच्या पालकांना सांगून त्यांना शाळेत आणले. तसेच कोरोनामुळे जे विद्यार्थी शाळा सोडून घरी होते, काहींना फी भरली नसल्याने त्यांना शाळेतून काढण्यात आले त्यांना शिक्षण मिळण्यासाठी शाळेत आणण्यात आले. यामुळे विद्यार्थी गळतीची संख्या कमी झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
दर्जेदार, डिजिटल शिक्षण - मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाने ओळखल्या जात आहेत. सर्व पालिका शाळांना एकाच प्रकारचा रंग दिला जात आहे. शाळांवरील नावाचे फलक आकर्षित बनवले जात आहेत. वर्गात चांगले बेंच, विद्यार्थ्यांना आवडेल असे वातावरण निर्माण केले जात आहे. शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे शिक्षण दिले जाते. दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. वर्गखोल्या (क्लासरूम) डिजिटल केल्या जात आहेत अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या आहेत. तसेच सी.बी.एस.ई. बोर्डच्या ११, आय.सी.एस.ई. बोर्डची १ शाळा सुरु केली आहे. या शाळांना दिल्ली बोर्डाची संलग्नता प्राप्त झाली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आय. बी. (I. B. - International Baccalaureate) बोर्डची शाळा सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच, माटुंगा येथील एल. के. वाघजी महानगरपालिका शालेय इमारतीमध्ये केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नीत आय.जी.सी.एस.ई. (IGCSE - International General Certificate of Secondary Education ) बोर्डची शाळा सुरू केली जाणार आहे असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
२०२० मध्ये निकालात झाली होती विक्रमी वाढ - २०१६ मध्ये दहावीचा निकाल ७६.९७ टक्के लागला होता. २०१७ मध्ये ८.६ टक्क्यांनी घाट होऊन ६८.९१ पर्यंत निकाल खालावला होता. २०१८ मध्ये ५ टक्क्यांची वाढ होऊन ७३.८१ टक्के निकाल लागला होता. २०१९ मध्ये अंतर्गत गुण रद्द केल्यामुळे निकालात २०.६६ टक्क्यांनी घट होऊन ५३.१५ टक्के निकाल लागला. २०२० मध्ये ४०.१० टक्क्यांची विक्रमी वाढ होऊन ९३.२५ टक्के लागला होता. २०२२ मध्ये ९७.१० टक्के लागला आहे.