मुंबई - शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. पावसामुळे मुंबईकरांची व चाकरमान्यांचे हाल झालेले पाहायला मिळत आहेत. यातच असल्फा मेट्रो स्थानका खालील गटार तुंबले असल्याने पाणी रस्त्यावर मोठया प्रमाणात बाहेर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर तळे साचले आहे.
मुंबईतील वाहतूक जागोजागी धीम्या गतीने चालू असलेली पाहायला मिळत आहे. आज (बुधवारी) सकाळ पासूनच उपनगरात जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचत आहे. आजच्या पावसाने महानगरपालिकेकडून केला जाणारा पावसाळापूर्व नालेसफाईचा दावा फोल ठरत आहे. हे आजच्या पावसातून उपनगरात दिसून येत आहे. या पावसात तुंबलेल्या नाल्यातून बाहेर प्लास्टिक व गाळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येत आहे.
मेट्रो १ च्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी कोसळत असल्याने मेट्रोच्या नाले सफाई कामात सातत्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. घाटकोपर मेट्रो स्थानका खाली पुलावरून कोसळणारे पाणी प्रवाशांना चिंब करत आहे.
असल्फा मेट्रो स्थानकाच्याखाली असलेले बंदीस्त गटार तुंबले व पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर पाण्याच्या वेगामुळे मोटारसायकल व रिक्षा या पाण्यातून वाट काढत जात आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळेची मुले यांना आज त्रासाला सामोरे जावे लागत आहे.