मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस. नायडू यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी 1 आठवड्यासाठी तहकूब केली आहे.
या सुनावणीच्या वेळी फिर्यादी पक्षाच्या वकिलांच्या मागणीनुसार सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आले. सुनावणी दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र मराठीत असून या संदर्भात जामीन याचिकेची सुनावणी दुसऱ्या न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावर, फिर्यादी पक्षाचे वकील ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी यावर आक्षेप घेत बचाव पक्षाचा युक्तिवाद हा 'हंटिंग ऑफ दि बेंच' असल्याचे म्हटले आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी 1 आठवड्या करिता तहकूब केली आहे. पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.