मुंबई : दादर पश्चिम येथे केंद्र सरकारच्या मालकीची इंदू मिल आहे. या जागेच्या बाजूलाच लागून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी हे स्मारक आहे. यामुळे इंदू मिलच्या जागेत डॉ. आंबेडकर यांचे स्मारक बनावे अशी मागणी आंबेडकरी जनतेची ( Babasaheb Ambedkar memorial Demand In Indu Mill )होती. मात्र ही जागा सरकार देण्यास तयार नसल्याने बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेच्या सहाय्याने या जागेवर ताबा मिळवला. यंदा या घटनेला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अद्यापही या जागेवर आंबेडकर यांचे स्मारक उभे राहिलेले नाही.
इंदू मिलमध्ये स्मारकाची मागणी : १९८९ पासून २० वर्षे सामाजिक समता परिषदेचे विजय कांबळे समुद्रात भराव घालून किवा इंदू मिलच्या जागेवर आंबेडकरांचे स्मारक व्हावे अशी मागणी करत होते. दरवर्षी ते रॅली, उपोषण आदी मार्गाने सरकारचे या मागणीकडे लक्ष केंद्रित करत होते. सरकारने मात्र ही मागणी २० वर्षे पूर्ण केली नाही. अखेर २०११ मध्ये डॉ. आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी समाज एकत्र आला. ६ डिसेंबर २०११ ला लाखो भीम अनुयायी दादर शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात आले असताना आंबेडकरी समाजाने इंदू मिलच्या दिशेने कूच केली.
इंदू मिलवर कब्जा : आंबेडकरी जनता हजारोंच्या संख्येने इंदू मिलच्या दिशेने चालून गेली. इंदू मिलचे लोखंडी गेट सुरक्षा रक्षकांनी बंद केले होते. पोलिसांना आंदोलनाची आधीच माहिती मिळाल्याने चैत्यभूमी ते इंदू मिल रस्त्यावर जागो जागी पोलिसांनी बॅरीकेटींग केले होते. प्रत्येक ठिकाणी बॅरीकेटींग बाजूला करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुध्द यांची मूर्ती समोर धरून आंबेडकरी जनता इंदू मिलच्या गेटवर पोहचली. गेटवर तैनात असलेल्या पोलिसांसोबत संघर्षानंतर आंबेडकरी तरुण गेटवर चढून मिलच्या आत शिरले. मिलच्या आतमधून गेट उघडण्यात आले.
२४ दिवस इंदू मिलवर कब्जा : मिलचे दरवाजे उघडताच आंबेडकरी जनतेच्या झुंडीच्या झुंडी इंदू मिलमध्ये घुसल्या. त्याचवेळी जो पर्यंत सरकार इंदू मिलची जागा स्मारकासाठी देणार नाही तो पर्यंत ताबा सोडायचा नाही असे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले. आंबेडकरी जनतेने इंदू मिलवर २४ दिवस आपला कब्जा ठेवला होता. तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकर यांचे स्मारकच होणार अशी घोषणा केली. त्यानंतर इंदू मिलमधील कब्जा आंबेडकरी जनतेने सोडला होता.
आठवले गटाचा धुडघुस : आंबेडकरी जनतेने इंदू मिल वर ताबा मिळवला असताना रिपाइ आठवले गटाच्या वतीने १५ डिसेंबर २०११ रोजी आम्हीही ताबा घेऊ असे म्हणत इंदू मिल मध्ये घुसून तोड फोड करत जाळपोळ केली. यामुळे एनटीसी ने कोर्टात धाव घेवून एनटीसीच्या मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे कारण देत बेकायदेशीर कब्जा घेणाऱ्या आंबेडकरी जनतेला एनटीसीच्या इंदू मिलच्या जागेतून बाहेर काढण्याचे आदेश मिळवले.
स्मारकासाठी सरकारकडून जागा : जनतेच्या भावनांचा आदर करत महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात ठराव करून इंदू मिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देत असल्याचा ठराव केला. इंदू मिलची संपूर्ण ११.९६ एकर जागा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांना भेटले असता इंदू मिल आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तत्वता देण्याचे मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले होते. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे कधी राहणार याची गेले ११ वर्षे आंबेडकरी जनता वाट बघत ( Babasaheb Ambedkar memorial Not Done ) आहे.
स्मारक आणि पुतळ्यावरून वाद : इंदू मिलमध्ये जो पुतळा उभा करण्यात येणार आहे. त्यात दुरुस्ती आणि काही त्रुटी आहेत. जो डमी पुतळा बनण्यात आला आहे, तो बाबासाहेबांच्या चेहऱ्यासारखा दिसत ( Controversy over Babasaheb memorial and statue ) नाही. यात हाताची ठेवण वेगळी आहे. बाबासाहेबांचा सर्वात सुंदर पुतळा मुंबईतील मंत्रालयासमोर आहे. या सारखाच पुतळा व्हायला हवा. सध्याचा बाबासाहेबांचा डमी पुतळा आहे, तो फायनल करू नये. जर हाच पुतळा उभा राहिला गेला तर त्याला विरोध होईल, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिलाय. तर . इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर उभे राहिलं अशी अपेक्षा ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
वर्षभरात काम पूर्ण करण्याचे निर्देश : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायींना यंदाही सोयी-सुविधा देताना सर्व यंत्रणांनी कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची खबरदारी घ्यावी. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे. यासाठी सामाजिक न्याय विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
२०२४ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण : इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू (11 years Completed taking possession of Indu Mill ) आहे. स्मारकातील पुतळ्याचा वाद आहे. हा वाद लवकर मिटवला जावा म्हणून डॉ. आंबेडकर यांचे कुटुंबीय आणि समाजाशी चर्चा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावावा. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. स्मारकाचे काम २०२४ पूर्वी पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जावे अशी मागणी आठवले यांनी केली.