मुंबई- इंदू मिल येथील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलून महाविकास आघाडी सरकारने नियोजन शून्यतेचे उदाहरण दिले आहे. नियोजित कार्यक्रमाच्या केवळ दीड तास आधी कार्यक्रम रद्द करून सरकरने भोंगळ कारभाराचे दर्शन दिले असले तरी ही स्थिती सावरण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या एमएमआरडीएने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
इंदू मिलमधील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे राहणार असून या स्मारकाचे २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन ही झाले आहे . आता नियोजित पुतळ्याच्या पायाभरणीसाठी सरकारने जी वेळ निवडली ती योग्य नव्हती, असा सूर निघत आहे. कोरोनाच्या काळात सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम होत आहेत. एकीकडे मुंबईत कोरोनाचा कहर वाढत आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात तणावाचे वातावरण आहे. मराठा कार्यकर्ते आणि संघटना मंत्र्यांच्या बंगल्यासमोर येऊन आंदोलन करत आहेत. या स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम घेणे उचित नसल्याचे मत खुद्द या स्मारकासाठी आंदोलन करणारे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत आनंदराज नाराज, काय म्हणाले पाहा...
गुरुवारी दुपारी दोनच्या दरम्यान एमएमआरडीए कडून या कार्यक्रमाच्या नियोजनाची घोषणा केली जाते. यात केवळ १६ मान्यवरांना प्रवेश देण्याचे सांगण्यात आले होते. त्याच बरोबर कोरोना काळ असल्याने फिजिकल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक असल्याने मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची ही नावे वगळली जातात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांना ही यातून वगळले जाते. सरकारला हा कार्यक्रम सर्वसमावेशक करता आला असता,पण नेमक्या याच काळात सरकारने अति घाईने हा कार्यक्रम उरकण्याचा का प्रयत्न केला , असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. डॉ. आंबेडकरांचे वारस असलेल्या कुटुंबियांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केल्या नंतर तडकाफडकी त्यांना निमंत्रणे धाडण्यात आली. केवळ सोळा मान्यवरांच्या उपस्थितितच हा कार्यक्रम होणार होता ,मग आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा निमंत्रण देण्याचे प्रयोजन काय? याबाबत एमएमआरडीएने अद्याप खुलासा केलेला नाही. एकूणच उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे सरकारच्या कारभारावर बोट ठेवले जात आहे.
हेही वाचा-...अन् मेसेज येताच अजित पवारांनी घेतला यू-टर्न!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही पुण्यातला कार्यक्रम आटोपून या नियोजित कार्यक्रमासाठी मुंबईच्या वेशीवर पोहोचले होते. मात्र, त्यांना कार्यक्रम रद्द झाल्याचा निरोप मिळताच ते माघारी पुण्याला परतले. एकाएकी ठरलेला कार्यक्रम रद्द होतो. याची पुसटशी कल्पना ही उपमुख्यमंत्र्यांना असू नये, अशी निर्णय प्रक्रिया राज्यात सुरु असल्याचा संदेश यामुळे जनसामान्यात गेला आहे. या पायाभरणी कार्यक्रमाच्या पडद्यामागे काय काय राजकीय घडामोडी घडल्या. तसेच प्रशासकीय पातळीवर याबाबत वेगाने काय हालचाली झाल्या याची माहिती पुढे येऊ नये याची काळजी राज्यकर्त्यांकडून घेतली जाईल. पण, दीड दिवसातल्या घडामोडीने सरकारच्या निर्णय प्रक्रियेचा चेहरा उघड झाला आहे.
हेही वाचा-'आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ येत्या काही दिवसात'
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम देशातल्या कोट्यावधी आंबेडकरी अनुयायांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या शिवाय मोठी व्होट बँक म्हणूनही राजकीय दृष्टया या मुद्यावर वारंवार भर दिला जातो. आता हा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने आयते कोलीत विरोधकांच्या हातात सापडले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे ऐकू नये, या पक्षांनी नेहमीच बाबासाहेबांची अवहेलना केली आहे. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचा पुतळा उभा न करता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नोट प्रमाणे त्या ठिकाणी आंतराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणताही पक्षपात न करता सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे धोरण अवलंबवावे. दुसरीकेड केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही. कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारून मुख्यमंत्री उद्धव यांना काय सांगायचे आहे? असा सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.
हेही वाचा-बाबासाहेबांच्या स्मारकातील पायाभरणीचा कार्यक्रम लपून छपून करण्याचे कारण काय?- देवेंद्र फडणवीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम जाहीर करुन नंतर रद्द केल्यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळ्याची पायाभरणी लपून-छपून आणि घाईघाईने उरकण्याचे कारण काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मागील सरकारने स्मारकासाठी एक इंचही जागा मिळवून दिली नाही. काही मंत्र्यांना देखील निमंत्रण मिळाले नव्हते, असे फडणवीस यांनी म्हटले. पायाभरणी कार्यक्रम जाहीर करुन रद्द करण्यामुळे राज्य सरकारचे हसू होत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
हेही वाचा-इंदू मिल येथील स्मारकात आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र उभे राहावे - प्रकाश आंबेडकर
कार्यक्रम पुढे ढकलल्याने उद्भवलेली स्थिती मुख्यमंत्र्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला आहे. इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र, अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरवल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, असे आवाहन ही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले असले तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत.