मुंबई- एका ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या प्रकरणावर बोलताना, पोलिसांना मारहाण होताना नागरिकांनी थंड बसून बघ्याची भूमिका घेऊ नये. अशा लोकांवर बहिष्कार टाका, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
काळबादेवी ट्राफिक डीव्हिजन येथे काम करत असलेले पोलीस हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना एक महिला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सादविका रमाकांत तिवारी व मोहसीन निजामउद्दीन खान या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत बोलताना, पोलिसांनी मारहाण प्रकरणातील दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी झाली आहे. त्यांना तुरुंगात पाठवण्या आधी जे त्या ठिकाणी बघे होते त्यांनी थंड बसता कामा नये. जे पोलीस आपल्यासाठी हुतात्मा झाले, त्यांच्यावर कोणी तरी ऐरेगैरे हात टाकतात आणि आपण सर्वजण सहन करतो, हे योग्य नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
आज त्यांच्यावर जरी कारवाई झाली असली, तरी समाजाने अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे राऊत म्हणाले. तसेच, पोलीस मारहाण प्रकरणात जी नावे आहेत ती विशिष्ट जाती धर्माची नाहीत. सरकारने ताबडतोब अर्धा तासात कारवाई केली आहे. डॉक्टरांवर हल्ले झाले तर कायदा केला जातो. त्याचप्रमाणे पोलिसांवर हल्ला झाल्यास कायदा बनवण्याची गरज असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मुंबई पोलीस चांगले काम करत आहेत. त्यांना मारहाण होणे योग्य नाही. पोलिसांवर हात उचलून त्यांचा व्हिडिओ बनवला जातो आणि तो फिरवला जातो. अशा लोकांवर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे, असे भाजप आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले.
हेही वाचा- चढ्या दराने मास्कची विक्री करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई