मुंबई - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार ताळ्यावर केलेल्या पाण्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाचा यंदा 94 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी 20 मार्चला लाखो आंबेडकरी अनुयायी महाड चवदार तळे येथे एकत्र येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी चवदार तळे येथे केलेल्या क्रांतीला अभिवादन करतात. यंदा मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंबेडकरी जनतेने येत्या 20 मार्च रोजी चवदार तळे येथे गर्दी करू नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य रामदास आठवले यांनी केले आहे.
राज्य कार्यकारीणीची बैठक रद्द
देशातील इतर राज्यांपेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत आहे. त्यामुळे यंदा चवदार तळे येथे आंबेडकरी जनतेने गर्दी करू नये. राज्यात सर्वांनीच गर्दी चे कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन आठवले यांनी केले आहे. रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्र प्रदेशची राज्य कार्यकारीणीची महत्वपूर्ण बैठक येत्या दि.27 मार्च रोजी जळगावमध्ये आयोजित केली होती. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दि.27 मार्चची रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारीणीची बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठकीची पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल, अशी घोषणा देखील आठवले यांनी केली आहे.
आंबेडकर जयंतीवर कोरोनाचे सावट
मागील वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने घरात सजावट करून साजरी करण्यात आली होती. मात्र, यावर्षी देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झालेली वाढ पाहता या वर्षीच्या जयंती वर सुद्धा कोरोनाचे सावट सध्यातरी दिसत आहे.