मुंबई - लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी ओढावल्याने घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा दहा हजाराची मदत करण्याची मागणी करत घरेलू कामगार महिलांनी आंदोलन केले. यावेळी सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेतर्फे पंचवीस हजार पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही महिलांनी दिला.
लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. अशाच प्रकारे मुंबईमध्ये घरकाम करणाऱ्या महिलादेखील गेल्या चार महिन्यापासून बेरोजगार असून लॉकडाऊनमुळे त्यांच्या चारितार्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सरकारने या महिलांना दरमहा दहा हजार रुपये मदत करावी अशी मागणी घरेलू कामगार संघटनेने केली आहे. सावित्रीबाई घरेलू कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनापत्र पाठवण्यात आले. चेंबूर येथील पोस्ट ऑफिसबाहेर महिलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा - स्टेअरिंग कोणाच्या हातात...? उद्धव ठाकरेंना अजित पवारांकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तीस लाखापेक्षा जास्त महिला घरकाम करत असून या घरकामावर या महिलांचा उदारनिर्वाह चालतो. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाल्यापासून यांचा रोजगार गेला असून अशा परिस्थितीत जगायचं कसं असा प्रश्न या महिलांनी सरकारला केला. त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असूनदेखील सरकारकडून त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, अशी खंत महिलांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या उदाहनिर्वाहचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली. तसेच, मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी महिलांनी दिला.